नवी दिल्ली: वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. जागतिक स्तरापासून ते भारतापर्यंत सोन्याचे दर त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. आता इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने आणखी महाग झाले आहे. मंगळवारी मुंबई सराफ बाजारात ९९.५ कॅरेट स्टैंडर्ड सोन्याचा १० ग्रैमचा भाव ७३,००८ आणि ९९.९ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ७३,३०२ रुपयांवर गेला आहे. सोन्याबरोबर चांदीची चमक देखील वाढली असून, एक किलो चांदीचा भाव ८३,२१३ रुपयांवर गेला आहे.
मार्चमध्ये १० टक्के वाढ झाल्यानंतर एप्रिलमध्येही सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. फेडरल रिझव्र्हेने जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीनंतर सोन्याच्या किमतीतील वाढीला आणखी चालना मिळाली आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुतीचा मागोवा घेत सोन्या चांदीच्या किमतींनी मंगळवारी सर्वकालिन उच्चांक गाठला.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी दिल्लीत १० ग्राम सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांनी ती ७३,७५० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर गेली. सोमवारी १० ग्राम सोन्याचा भाव ७३,०५० रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीच्या भावाने ८०० रुपयांची उसळी घेत प्रति किलो ८६,५०० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.
दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याच्या किमती (२४ कॅरेट) ७३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. इराणने गेल्या आठवड्यात इस्त्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याच्या भीतीने सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढल्याने सोने वधारले आहे, असे गांधी यांनी सांगितले.
या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यापासून सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत असून, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून दर कपातीची अपेक्षा आणि वाढत्या भौगोलिक- राजकीय तणावामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांनी सांगितले.