मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात उमेदवारी वाटपावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या ‘आयारामां’ना तिकीट दिल्याने भाजपमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि महायुतीतील वाढत्या गुन्हेगारीकरणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“काँग्रेसमुक्त भारतची भाषा करणारा भाजप आता ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला आहे,” अशी खोचक टीका सपकाळ यांनी केली. नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये सुरू असलेला गोंधळ हा आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा दावा त्यांनी केला. मूळ भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून पक्ष ‘उपऱ्यांच्या’ हाती गेला असून, लवकरच पक्षाचे नियंत्रण रेशीमबागेतून नव्हे तर उद्योगपतींच्या हातात जाईल, असेही त्यांनी सुनावले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सपकाळ यांनी गंभीर आरोप केले. “हा पक्ष आता गुंड, माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणारा बनला आहे,” असे म्हणत त्यांनी मराठवाड्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा उल्लेख केला. तसेच काही प्रकरणांत ड्रग्ज वितरणाशी संबंधित व्यक्ती पक्षाशी जोडल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चिघळले असून तिकीट वाटपावरून सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने झाली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गाड्यांना काळे फासणे, रस्त्यावर अडवणे अशा घटनांमुळे तणाव वाढला. अखेर आमदार संजय केणेकर यांनी मध्यस्थी करत नाराज कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिशा स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले की, “2026 हे वर्ष काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष असेल. पक्षबांधणी, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि वैचारिक लढाई यावर भर देत आम्ही अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत.”