ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री राणेंचे वादग्रस्त वक्तव्य : महाविकास आघाडीच्या मतदार संघात रुपयाचा निधी देणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप  प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक पुन्हा एकदा सत्ताधारीवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

मंत्री राणे म्हणाले कि, ‘ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला आहे. कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे धक्कादायक विधान केले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असे विधान केले. मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि या विकास आघाडीचे अस्यक असलेल्या गावांची यादी काढा.

जिथे-जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढे मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

महायुतीचा झेंडा दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा; भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!