ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ ; उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था

खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला ‘नकली सेना’ म्हणत आहेत. ‘चंदा लो, धंदा दो’ हे त्यांचे धोरण आहे. ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’, अशी वृत्ती असलेला ‘भाकड’, ‘भेकड’, ‘भ्रष्ट जनता पक्ष’ असा उल्लेख करत शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला मंगळवारी प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीची मंगळवारी जागावाटपाची घोषणा करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ठाकरे माध्यमांसमोर बोलले. ते म्हणाले, नवे वर्ष आनंदाचे, सुखसमृद्धीचे आणि हुकूमशाही नष्ट करणारे असो. जागावाटपासाठी आघाडी असो की युती, शक्य असेल तोपर्यंत चर्चा कराव्याच लागतात. प्रत्येक घटकाचा तो अधिकार आहे. परंतु कालांतराने सामंजस्याने निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक जागेवर लढण्याची प्रत्येक पक्षाची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असते. मात्र जिंकण्याचे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर सर्व इच्छा आणि महत्त्वाकांक्षांना आवर घालावा लागतो. कशासाठी, कोणासाठी आणि कोणाविरोधात आपण लढत आहोत, हे लक्षात घेत निर्णय घेऊन मैदानात उतरावे लागते आणि जिंकावेही लागते. महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या मनात आता काहीही प्रश्न किंवा शंका नाहीत. शिवसेनेने सर्व २१ जागांवरील उमेदवार जाहीर केले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार एक-दोन दिवसांत जाहीर करतील. ‘अब की बार भाजप तडिपार’ हे जनतेने ठरवले आहे. जनता ते करून दाखवणार आहे. त्यामुळे आम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी झाली. अमावास्या, सूर्यग्रहण आणि मोदी असे विचित्र योग जुळून आले होते. मोदींनी केलेले भाषण हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभेल असे नव्हते, अशी टीका करून ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख ज्या पक्षाला कमळाबाई म्हणायचे, त्या भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्षाच्या एका नेत्याचे, मोदी यांचे ते भाषण होते. पंतप्रधानपदाबाबत मला आदर असून त्या पदाची प्रतिष्ठा आम्हीही जाणतो. पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणीही त्या पदावर राहत नाही. भाजप आणि व्यक्ती म्हणून मोदींना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.

महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तीने येथे येऊन जनतेला ‘असली शिवसेना-नकली शिवसेना’ सांगावे म्हणजे कहर झाला, अशी टिप्पणी करून ठाकरे म्हणाले, भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह २०१९ मध्ये ‘मातोश्री’ वर आले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घातले होते. त्यावेळीही पक्षप्रमुख मीच होतो. आमची हीच शिवसेना होती. त्यांना आता याचा विसर पडला आहे. खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेबाबत बोलणे योग्य नाही. त्यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती, मात्र आपण ती पळवू दिली नाही. त्यामुळे चायनीज माल घेऊन ते दावे करत आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे समर्थन करत, इंडिया आघाडी सत्तेत आल्यास त्याची अंमलबजावणी होईल, असा विश्वास ठाकरे यांनी दिला. राज्यासाठी वेगळे मुद्दे आणि आवश्यकता असल्यास महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!