मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी जाहीरपणे माफी मागावी लागली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावले आहे. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर मंत्र्यांना ‘एकदा-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यातील संवेदनशील विषयावर सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.
याच प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या आरोपांतून पक्ष काहीसा सावरतोय तोच दुसरीकडे मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि नियोजित बैठकीस अर्धा तास उशीरा पोहोचले. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांनी चांगलेच झापले.
शेतकरी कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला असता. “तुम्हाला पाईपलाईला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? कर्जमाफीचे पैसे तुम्ही सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरता,” असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
यापूर्वीही पीकविमा योजनेवरून ‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही’, असे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. तसेच खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी निवडीबाबत वक्तव्य करून कोकोटे यांनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढावून घेतली होती.