सोलापूर, वृत्तसंस्था
टपाल खात्याच्या सेवेसंबंधीच्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे डाक अदालतीचे आयोजन करते. प्रवर अधिक्षक डाकघर सोलापुर यांच्या कार्यालयामध्ये 117 वी डाक अदालत दि.16. डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित केली आहे.
पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये/पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक तसेच मनिऑर्डरबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. के. नरेंदर बाबु, प्रवर अधिक्षक डाकघर, सोलापुर विभागीय कार्यालय, सोलापुर – 413001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 12 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्यापुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावीत. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असेही डाकघर विभागाकडून कळविण्यात आले आहे.