मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी फोन करून पवार यांना देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पवारांच्या निकटवर्तीयांनी मुंबईतील गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. शरद पवारांचा कालच वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर त्यांची हत्या करण्याबाबत धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे.