छत्रपती संभाजीनगर वृत्तसंस्था : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी पराभवाचे कारण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींनी आत्मपरीक्षण केले, तर काहींनी मतदारांवर नाराजी व्यक्त केली. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीत पराभूत शिवसेना उमेदवाराने थेट जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा अजब आणि खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक २० डिसेंबर रोजी पार पडली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी, १८ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मधील भारत माता मतदान केंद्रावर कथित जादूटोण्याचा प्रकार आढळून आला होता. या घटनेची त्या वेळी परिसरात मोठी चर्चा झाली होती. आता याच घटनेचा थेट निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचा आरोप शिवसेनेचे पराभूत उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे.
अमित वाहुळ यांचा आरोप आहे की, जादूटोण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक मतदारांनी मतदानच टाळले. काही मतदारांनी भीतीपोटी आपला मतदानाचा निर्णय बदलल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी अमित वाहुळ यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी** केली आहे. ग्रामीण भागात अजूनही जादूटोण्याबाबत भीती कायम असून, अशा प्रकारामुळे लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला धक्का बसतो, असा आरोप त्यांनी केला. मतदान प्रक्रियेला बदनाम करण्यासाठीच हा प्रकार रचण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.