नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. या घटनेने दिल्लीतील राजकारण प्रचंड तापले आहे.
अटकेनंतर अरविंद केजरीवाल हे राजीनामा देणार नसून, ते तुरुंगातूनच मुख्यमंत्रीपदाचा कारभार चालवतील, असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. या अटकेच्या कारवाईविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी सांगितले. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंबंधित हवालाकांड प्रकरणी ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, अशी आशंका यापूर्वी व्यक्त करण्यात येत होती. अटकेपासून आपणास संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तसे करण्यास नकार दिल्यानंतर तातडीने ईडीच्या सहा ते आठ अधिकाऱ्यांच्या चमूने गुरुवारी सायंकाळी सर्च वॉरंटसह के जरीवाल यांचे निवासस्थान गाठले. त्यावेळी सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आम आदमी पक्षाचे (आप) ५५ वर्षीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या या कारवाईने दिल्लीसह देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणसंबंधित कथित हवालाकांडप्रकरणी ईडीने केजरीवाल यांच्या विरोधात कारवाईचा हा फास आवळला आहे. या प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत ९ समन्स बजावले होते; परंतु ते चौकशीस उपस्थित राहिले नव्हते. अखेर गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी सर्च वॉरंट घेऊन केजरीवालांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.