ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोल्हापुरातील महापुराला उतार ; तीन रस्ते केले खुले

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून अनेक शहरात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सध्या पंचगंगेच्या महापुराचा शहरासह परिसराला पडलेला विळखा रविवारपासून सैल होऊ लागला. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, धरणातील विसर्गही कमी होत गेला. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाललेली पंचगंगेची पातळी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून कमी होऊ लागली आहे.

यामुळे पुरालाही उतार सुरू झाला असून, पूरग्रस्त नागरिकांसह शहरालाही दिलासा मिळाला आहे. शहरातील तीन रस्ते पाणी ओसरल्याने वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. पंचगंगेची पातळी शनिवारी रात्री ९ वाजता ४७.८ फुटांवर गेली. यानंतर रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आठ तास पातळी स्थिर राहिली.

सकाळी सहा वाजल्यापासून पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता पाणी पातळी ४७.७ फूट झाली. ती कमी होण्यास सुरुवात झाली. दिवसभरात ८ इंचांनी पाणी पातळीत घट झाली. रात्री ९ वाजेपर्यंत पातळी ४७ फुटांपर्यंत खाली आली होती. पाणी पातळी कमी होत चालल्याने पुराचा विळखाही सैल होत चालला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात व्हीनस कॉर्नर येथे आलेले पाणी वेगाने ओसरत आहे. यामुळे व्हीनस कॉर्नर-दसरा चौक मार्ग दुपारनंतर खुला झाला. शाहूपुरी सहाव्या गल्लीत आलेले पाणीही मागे सरकले, यामुळे या गल्लीतील वाहतूक सुरू झाली. स्टेशन रोड जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर (असेम्ब्ली रोड) आलेले पाणीही ओसरले, यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

जयंती नाल्यावरील पाणी पातळी कमी होत चालली आहे. सोमवारी हा मार्गही खुला होईल, अशी शक्यता आहे. शनिवारी पंचगंगा तालमीपुढे गेलेले पाणी आज रात्री पुन्हा तालमीसमोर आले. शहरात रविवारी रात्री उशिरा व्हीनस कॉर्नर-कोंडा ओळ मार्गासह शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी होते. बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत, लक्षतीर्थ वसाहत आदीसह पुराचे पाणी शिरलेल्या परिसरात वाढलेल्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group