---Advertisement---

दिल्लीत शिंदेंची धडक; जागावाटप, ‘अंतर्गत अहवाल’ आणि महायुतीत समन्वयावर निर्णायक चर्चा !

By team
On: March 17, 2026 10:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंगळवारी (दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि महायुतीतील समन्वय या मुद्द्यांवर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने एक गोपनीय ‘अंतर्गत अहवाल’ तयार केला असून, मागील तीन निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांत मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने पक्षाच्या उमेदवारांना फटका बसल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांत अशा चुका टाळण्यासाठी आणि महायुतीत समन्वय अधिक बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदे हे हा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून आपली भूमिका ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची भूमिका कशी असावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी खासदारांनी आक्रमक भूमिका घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राजकीय बैठकींबरोबरच शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावरही एकनाथ शिंदे हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. या लढाईत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी ते स्वतः वकिलांकडून सविस्तर आढावा घेत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही बुधवारी दिल्लीला जाणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘केंद्रीय संचलन समिती’ची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तिकीट वाटप आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील दोन्ही प्रमुख नेत्यांच्या सलग दिल्ली दौऱ्यांमुळे महायुतीतील समीकरणे, जागावाटप आणि आगामी निवडणुकांची दिशा याबाबत लवकरच स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!