ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई ते नाशिकपर्यंत फटका, तरी काँग्रेस येथील गड राखला !

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यभरात सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी मुंबईतील एका वॉर्डात भाजपला अत्यंत अनपेक्षित असा धक्का बसला आहे. सांताक्रूझ येथील वॉर्ड क्रमांक 90 मध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या उमेदवारावर अवघ्या सात मतांच्या फरकाने विजय मिळवत संपूर्ण निवडणुकीतील सर्वाधिक थरारक निकाल नोंदवला आहे.

मतमोजणीनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी भाजपच्या ज्योती अनिल उपाध्याय यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव केला. मिरांडा यांना 5,197 मते, तर उपाध्याय यांना 5,190 मते मिळाली. अवघ्या सात मतांचा हा फरक भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून, हा निकाल बीएमसी निवडणुकीतील सर्वात चर्चेचा ठरला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 वॉर्डांपैकी वॉर्ड क्रमांक 90 हा सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. या वॉर्डाची लोकसंख्या सुमारे 56 हजार 468 इतकी असून, गेल्या अनेक निवडणुकांपासून हा प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागातील अटीतटीच्या लढतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राज्यभरात भाजपची घोडदौड सुरू असतानाच, मुंबईत काँग्रेसने मिळवलेला हा थरारक विजय राजकीय समीकरणांमध्ये नवा संदेश देणारा ठरत आहे. अवघ्या काही मतांवर सत्ता आणि पराभव ठरत असल्याने, प्रत्येक मताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!