मुंबई वृत्तसंस्था
भाजप नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच आज विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. तसेच, महाराष्ट्रातल्या जनतेला सांष्टांग दंडवत घातलं. त्याचप्रमाणे, फडणवीसांनी ‘एक है, तो सेफ है’ हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केल्याचंही वक्तव्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सगळ्यांचे आभार की, एकमतानं माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. ‘एक है, तो सेफ है’ हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो. भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन, आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो.”
“आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू, 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही, माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं, एक वर्ष फक्त 72 तासांसाठीच होतो, पण टेक्निकली मुख्यमंत्रीपदी होतोच, त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं… आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही, लार्जर इंटरेस्टमध्ये आपण एकत्र काम करू, कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरुद्ध होतात, तरीही लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळ्यांशी जुळवून घेऊ…”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा
महायुती : 237
मविआ : 49
अपक्ष/इतर : 02
एकूण : 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा
भाजपा : 132
शिवसेना (शिंदे गट) : 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 41
काँग्रेस : 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : 10
शिवसेना (ठाकरे गट) : 20
समाजवादी पार्टी : 2
जन सुराज्य शक्ती : 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी : 1
राष्ट्रीय समाज पक्ष : रासप : 1
एमआयएम : 1 जागा
सीपीआय (एम) : 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय : 1
राजर्षी शाहू विकास आघाडी : 1
अपक्ष : 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती : 2
युवा स्वाभिमान : 1
रासप : 1
अपक्ष : 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ 132+5 = 137