मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भारतीय जनता पक्ष स्वबळावर राज्यात विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही. मात्र निवडणुकीनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. आपण जमिनीवर काय परिस्थिती आहे त्याबद्दल व्यावहारिक असले पाहिजे. सत्ताधारी महायुतीचा भाग असलेला भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने निवडणूक लढवू आणि जिंकू शकतो.” असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
“राज्यात भाजप एकटा विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही, पण आमच्याकडे सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे हे खरे आहे. निवडणुकीनंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तिन्ही पक्षांच्या मतांचे एकत्रीकरणच आम्हाला विजयी करू शकेल.” तिकीट न मिळाल्याने भाजप नेत्यांच्या नाराजी आणि बंडखोरीबाबत फडणवीस म्हणाले की, “जागावाटपाबाबत तडजोड करायला कोणीही तयार नाही. आमच्या काही महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी मला वाईट वाटते. ज्यांना यावेळी निवडणूक लढवण्याची संधी देता आली नाही.” असे देखील फडणवीस म्हणाले.
महायुतीतून भाजपने 121 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने 45 जागांवर उमेदवार जाहीर केले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 49 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एकूण 215 जागांवर युतीचे उमेदवार निश्चित झाले असले तरी 73 जागा शिल्लक आहेत. रविवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.