स्वामी कृपेने लाभलेल्या मंत्रीपदाची सेवा सामान्य जनतेसाठी समर्पित ;मंत्री संजय राठोड यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
अक्कलकोट, दि.८ : श्री स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज अक्कलकोटला येऊन वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाची संधी लाभल्याने मनापासून आनंद झालेला आहे. स्वामी कृपेने आपणास मंत्रिपदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी लाभलेली आहे, त्यामुळे स्वामी कृपेने लाभलेल्या मंत्रिपदाची सेवा सामान्य जनतेसाठी समर्पित असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केले. बुधवारी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.पुढे बोलताना राठोड यांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील श्री. स्वामी समर्थांचे हे मूळ स्थान व त्याची कीर्ती आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. या धर्तीवर मंदिर समितीने बऱ्याच सोयी सुविधा निर्माण करत मंदिरातील सुशोभीकरण, गाभारा नूतनीकरण आदी विकासकामे करून भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून प्रसन्नता पूर्वक होणाऱ्या स्वामी दर्शनाने भाविकांना मनशांती व समाधानाची भेट दिलेली आहे. मंदिर समितीचे हे स्तुत्य उपक्रम पाहून मलाही खूप आनंद झाला असून मंदिर समितीच्या अशा सर्वांगीण विकास कामांकरिता माझे नेहमीच मंदिर समितीस सहकार्य राहील असेही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब सिरसट, डी.वाय.एस.पी.राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, उद्योजक लाला राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काजळे, भाजपा तालुकाप्रमुख मोतीराम राठोड, बंटी राठोड, विलास राठोड, रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, अजय मुकणार, राहुल रुही,बाळासाहेबांची शिवसेना अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, दीपक मडीखांबे आदी उपस्थित होते.