अलगुडमधील नाथषष्ठी कार्यक्रमाकडे भाविकांचे वेधले लक्ष
सद्गुरू गुरूबाबा औसेकर महाराजांच्या चक्रीभजनात भाविक मंत्रमुग्ध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मराठवाड्यातील एकमेव अद्वैत धर्मप्रसारक, सदगुरू सांप्रदायिक धर्मपीठ असलेल्या औसा (जि. लातूर) येथील सदगुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या नाथषष्ठी उत्सवाला आलगुड (ता.बसवकल्याण ) येथे भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.या कार्यक्रमात सत्संग, चक्रीभजन, धर्मसभा आणि नामसंकीर्तन सोहळ्यात भाविक अक्षरशा : चिंब झाले.या कार्यक्रमाला काशी पिठाचे जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्री क्षेत्र हरकुड येथील ष. ब्र.डॉ.चन्नवीर शिवाचार्य स्वामीजी यांनी हजेरी लावली.
त्यामुळे संपूर्ण अलगुड परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.सोमवारी, संध्याकाळी सदगुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन संपन्न झाले.तत्पूर्वी पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा झाली.औसा नाथ संस्थानच्या परंपरेनुसार गेल्या २२७ वर्षांपासून सुरु असलेला नाथषष्ठी उत्सव यंदा महाराष्ट्र कर्नाटक सिमेलगत असलेल्या अलगुड येथे सुरु आहे. उद्या गोपाळकाल्याने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. नाथषष्ठीची परंपरा औसेकर महाराजांच्या घराण्यात आली, जी आजतागायत निष्ठेने जोपासली जात आहे. जवळपास २२६ वर्षापासून हा नाथषष्ठीमहोत्सव श्रद्धेने, निष्ठेने प्रत्येक वर्षी वेग वेगळ्या राज्यात ठिकाणी साजरा होतो.यावर्षी कर्नाटकातील श्रीक्षेत्र अलगुड येथील २२७ व्या श्रीनाथ षष्ठीउत्सवाच्या प्रथमदिनी श्री तुकाराम बीजनिमित्त नाथांचे आणि श्रीमंत सद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूजन करून तुकाराम तुकाराम जयघोष करीत दुपारी बारा वाजता गुलाल उधळण करण्यात आली. माधव स्वामी महाराज सलगरकर यांचे गुलालाचे कीर्तन झाले.
सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर, सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर,ह. भ. प. श्रीरंग महाराज, ह. भ. प. ज्ञानराज महाराज आणि आईसाहेब श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अलगुड ग्रामस्थासह धाराशिव, लातूर जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांची कीर्तन सेवा झाली. ते म्हणाले की, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे मुळस्थान पैठण येथे नाथांचे मंदिर व नाथांच्या साधनेने तपश्चयनि पुनीत झालेल्या सर्व वस्तू स्थळ, जागा,आपल्याला पहायला मिळतील पण, पैठण व्यतिरिक्त नाथांचे असे भव्य दिव्य मंदिर कर्नाटकातील या अलगुड गावातील अलौकिक चित्र पहायला मिळाले.
चक्रीभजनाने वेधले लक्ष
नाथषष्ठी उत्सवात परंपरेने सुरु असलेल्या चक्रीभजनाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. सदगुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांचे दररोज सायंकाळी टाळ, मृदंग, चिपळ्या, डफ, दिमड्याच्या निनादात परमेश्वराच्या नामघोषात हृदयाचा ठेका चुकविणारे लक्षवेधक चक्रीभजन सुरू आहे.
दहा हजार भाविकांची हजेरी
नाथषष्ठी उत्सवाला कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविकांची हजेरी मोठ्या संख्येने आहे. बहुतांश भाविकांचा या पवित्र स्थळी मुक्काम आहे. अलगुड ग्रामस्थासह अनेक भागातील दानशुर व्यक्तींनी महाप्रसादासाठी मदत केली आहे. दररोज सकाळी नाष्टा, दुपारी व सांयकाळी महाप्रसादाची सोय केली आहे. साधारणतः दहा हजार भाविकांची उत्सवास्थळी हजेरी दिसून येते.