पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे.
दरम्यान देहूतील इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. तर, देहूतील शेत-शिवारात राहुट्या उभारून भाविक कीर्तन, प्रवचन ऐकण्यात तल्लीन झाले आहेत. टाळ-मृदंग आणि विठुनामाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
तुकाराम बीज काय आहे?
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचे वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झाले असे मानले जाते. संत तुकाराम महाराजांना देव सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हटले जाते.
या बीज सोहळ्याच त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मुख्य मंदिर आणि प्रसार आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिर, महाप्रवेशद्वार, चौदा टाळकरी कमान, वैकुंठस्थान मंदिर, नांदुरकीचा वृक्ष, भक्ती निवास, आणि गाथा मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण देहूनगरी व परिसर या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. एकूणच संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त संपूर्ण देहूनगरी सजून गेली आहे.लाखो वारकरी भाविक भक्त देहूनगरीत दाखल होत असून, आकर्षक अशा कमानी आणि विद्युत रोषणाईकडे कुतूहलाने पहात आहेत. भाविकांच्या प्रवासासाठी पीएमपीएलच्या वतीने गावाबाहेर बसथांबा करण्यात आला असून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. स्वारगेट, पुणे स्थानकांतून बसेस उपलब्ध आहेत.