---Advertisement---

महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगांवर भाविकांची अलोट गर्दी ; ‘हर हर महादेव’च्या गजरात महाराष्ट्र दुमदुमला !

By team
On: February 15, 2026 11:12 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.

घृष्णेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परराज्यांतूनही हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असून संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमला आहे. वैद्यनाथ मंदिर, परळी येथे प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा पार पडली. दागदागिन्यांनी मढविलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर येथे देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असून पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

भीमाशंकर येथे विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तरीही महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मंदिर बंद असल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील भाविकांनी स्थानिक मंदिरांत गर्दी केली. विशेषतः पिंपळे सौदागर येथील पेशवेकालीन मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिर येथे मध्यरात्रीपासूनच २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. तसेच ९६६ वर्षे जुने अंबरनाथ शिव मंदिर येथेही मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. बनारससह विविध राज्यांतून भक्त दर्शनासाठी आले असून सुरक्षेच्या कारणास्तव यंदा गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन देण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील सरोवराच्या मध्यभागी वसलेले १२ व्या शतकातील प्राचीन कनकालेश्वर मंदिर येथे पहाटे महापूजा पार पडली. विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. पुण्यातील मुठा नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर, पुणे येथे शंखनाद, अभिषेक आणि फुलांच्या सजावटीत भक्तांचे स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माजलगाव येथे तहसीलदारांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे अद्भुत चित्र पाहायला मिळत असून ‘हर हर महादेव’च्या जयघोषात महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!