ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या

करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव

बीड, वृत्तसंस्था 

 

 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याप्रकरणात अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांच्यातर्फे अॅड. चंद्रकांत ठोंबरे हे काम पाहत आहेत.

 

करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आणि इतर आरोप केले आहेत. या निवडणूक याचिकेचा स्टॅम्प नंबर ५०९/२०२५ असल्याचे अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी पत्रकात म्हटले आहे. याचिकेत म्हटल्यानुसार, करुणा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ३० ऑक्टोबर २०२४ रोजी फेटाळला होता.

 

मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित केले होते. त्यानंतर करुणा मुंडे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे.

 

या याचिकेत करुणा मुंडे यांनी असे म्हटले आहे की, आपण १९९६ साली कायदेशीर लग्न झालेली पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतले.

 

तसंच, बऱ्याच मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावू दिले नाहीत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान केंद्रावर प्रवेश करू दिला नाही. त्यांना मारहाण करून धमक्या दिल्या. तसेच अॅड. माधवराव जाधव यांना मारहाण केली. भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, असे अनेक आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!