ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोपांचा भडिमार !

पुणे वृत्तसंस्था : पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. “पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं, ही लोक शिवसेनेला फसवणार आहेत” असे म्हणत धंगेकरांनी भाजपवर विश्वासघाताचा ठपका ठेवला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवल्यामुळे एबी फॉर्म पोहोचवायलाही वेळ मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला.

युती होईल या अपेक्षेने शिंदे सेनेचे कार्यकर्ते तयारीत होते. मात्र ऐनवेळी भाजपकडून सन्मानजनक जागावाटप न झाल्याने युती तुटली आणि शिंदे सेनेला स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले. यामुळे १६५ उमेदवार उभे करता आले नाहीत, तरीही ११० उमेदवार रिंगणात असल्याचे धंगेकरांनी स्पष्ट केले. “दुःख याचं आहे की आमचे कार्यकर्ते गाफील राहिले” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

इतक्यावरच न थांबता धंगेकरांनी भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. “पुणे शहरात भाजपचे नेतृत्व मंगळसूत्र चोर करत आहेत, हे पुणेकरांचं दु:ख आहे” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. स्थानिक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फसवल्याचा आरोप करत, पुणेकर कधीही अशा नेतृत्वाला मान्यता देणार नाहीत, असा ठाम दावा त्यांनी केला.

भाजपमध्ये आयात नेत्यांचा भरणा होत असून कार्यकर्ते संपत चालल्याची टीकाही धंगेकरांनी केली. “खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारा पक्ष शिवसेनाच आहे” असा दावा करत, १६ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे शहरातून मोठी भेट देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी अजित पवारांचे कौतुकही केले.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, महापालिका निवडणूक रंगतदार आणि संघर्षमय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!