सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहा पानांचे राजीनामा पत्र लिहीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करून हे पत्र राज्य काँग्रेस कमिटीला पाठवून दिले आहे. आता या आरोपांना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धीपत्र काढत धवल सिंह मोहिते पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले. वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवडयापूर्वीच कळाले होते.आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात. त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे साहेबांनी सन्मानाने जिल्हा अध्यक्ष केले. त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले. पद घेताना नेत्यांच्या दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायचे ही कुठली पद्धत आहे?, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेसभवनमध्ये आले. काय काम केले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. गेले एक वर्षे काँग्रेस भवनाकडे साधे फिरकले सुद्धा नाही आणि कामाची भाषा बोलतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उघडपणे काम करत भाजपला मदत केले होते. तसेच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम सातपुते यांचे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या अनेकांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती.