मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावरून महायुतीमधील मतभेद पुन्हा दिसून आले आहेत. फडणवीस यांच्या या विधानावर अजित पवारांच्या पक्षातील नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, संवादासंदर्भातील गोष्टी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते. दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे आहेत की, मुख्यमंत्र्यांचाच आमच्यासोबतचा संवाद कमी आहे? हे शोधावे लागणार आहे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे टायमिंग नक्कीच चुकले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी खुश होण्याचे कारण नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले.
इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण संवादात चांगले आहे? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असे फडणवीस म्हणाले होते.
पुढे बोलताना अमोल मिटकरी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी दिल्लीहून दबाव असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले, संजय राऊत पुस्तक लिहिल्यावर आजही स्वर्गात असल्यासारखे बोलत आहेत. पुस्तकाच्या खपासाठी संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करत आहेत. तसेच त्यांच्या वक्तव्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.