मुंबई : वृत्तसंस्था
लोकांना गायब करणे ही काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे. राजेश पायलट, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी यांचा मृत्यू झाला हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, असे देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. माधवराव शिंदे यांच्या मृत्यू बाबत देखील उदयनराजे भोसले यांनी शंका व्यक्त केली आहे. माधवराव शिंदे यांचा मृत्यू हा रस्ता अपघातात झाला होता. तर राजेश पायलेट आणि वायएसआर रेड्डी यांचा मृत्यू विमान अपघात झाला होता.
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती सातारा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. 29 एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेत आपण यासाठी आग्रह करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशाचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्व.यशवंतराव चव्हाण यांचे देशासाठी दिलेले योगदान बघता त्यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. 29 एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेत आपण यासाठी आग्रह करणार असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांना संबोधले जाते. मात्र, तरी देखील यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी शरद पवार यांनी का केली नाही? असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राजकारण्यांनी फक्त राजकारण केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. काँग्रेसने केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा फायदा घेतला, त्यांनी ही मागणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे भोसले यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.