सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती पण भाजपने मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली असून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते, उत्तम जानकर या सर्वांची नावे चर्चेत आहेत.
या तीन नावांसह भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, माजी खासदार शरद बनसोडे यांची देखील पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. शिवाय सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे देखील नाव चर्चेत होते. आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागासवर्गीय समाजाचा दाखला असून ते लोकसभेसाठी रिंगणात असतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र विजयकुमार देशमुख यांनी स्वतः नकार दिल्याचे बोलले जातं आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये धक्कातंत्र वापरत भाजपने नवखे उमेदवार दिले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप नेमके काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.