ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमधील दिशा एम्पायरला पब्लिक बिल्डिंग श्रेणीमधे प्रथम पुरस्कार

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

असोसिएशन कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्यावतीने आयोजित आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड्स २०२४-२५ मध्ये अक्कलकोटमधील दिशा एम्पायर या वास्तूला पब्लिक बिल्डिंग श्रेणीमधे प्रथम पुरस्कार देण्यात आला.हॉटेल बालाजी सरोवर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात एजाज मुतवल्ली यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमास अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे फंक्शनल हेड -इंजि जयशंकर कन्टीकारा,सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे, शहर अभियंता इंजिनिअर सारिका अकुलवार, झोनल हेड टेक्निकल अरविंद महाजन उपस्थित होते. या पुरस्कारासाठी सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून विविध चार श्रेणी मधून इमारतींच्या निवडी करण्यात आल्या.

पुरस्काराकरिता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ८६ इमारतींची पाहणी करण्यात आली होती. पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. शशिकांत हलकुडे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट इंजि जगदीश दिड्डी, इंजिनिअर शितलराज सिंदखेडे, इंजिनिअर प्रशांत मोरे, इंजिनिअर मनोहर लोमटे, आर्किटेक्ट चंदुलाल अंबाल व इंजिनिअर राजीव दिपाली यांनी काम पाहिले. पर्यावरण पूरक बांधकाम,कमी कार्बन उत्सर्जन, रेन वॉटर हार्वेस्टिंग,रूफ टॉप सोलर,  बांधकामाच्या उत्कृष्ट पद्धती, काँक्रीटचा दर्जा, ग्रीन बिल्डिंग फीचर्स या निकषावरती पुरस्कारांची निवड करण्यात आली.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग  सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.डॉ.शशिकांत हलकुडे यांनी ज्युरी रिपोर्ट सादरीकरण केले. कार्यक्रमास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम क्षेत्रातील सुमारे सातशे अभियंते, आर्किटेक्ट उपस्थित होते.अक्कलकोटच्या या वास्तूचे काम आर्किटेक्ट प्रशांत सिंगी, स्ट्रक्चरल डिजायनार अनिल गांधी (पुणे) तर साईट इंजिनियर म्हणून अशोक येणगुरे ( अक्कलकोट ) यांनी काम पहिले. अक्कलकोटसाठी ही अभिमानास्पद बाब असून सर्व स्तरातून दिशा एम्पायर बांधकाम टीमचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!