ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रलंबित वैद्यकीय देयके निपटाऱ्यासाठी विशेष मोहीमेमध्ये 791 देयकांचा निपटारा : सीईओ स्वामी

सोलापूर :  कोविड काळात शासनाकडून राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. याच निर्बंधाचा एक भाग म्हणून शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थिवरही निर्बंध लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोविड उपाययोजनेच्या कामात सर्व संवर्गीय कर्मचारी व्यस्त होते.  या सर्वांचा परिणाम म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके प्रलंबित राहिली. त्याचप्रमाणे अनेक अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले होते त्यामुळे वैद्यकीय देयकांची संख्या देखील वाढली. दरम्यान जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे प्रलंबित वैद्यकीय देयके निपटाऱ्यासाठी मागण्या केल्या होत्या. प्रलंबित वैद्यकीय देयाकांचा आढावा घेतला असता या देयकांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्व प्रलंबित वैद्यकीय देयकांचा निपटारा करण्यासाठी सीईओ स्वामी यांनी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता.

दिनांक 18 डिसेंबर रोजी शनिवारी सुट्टी असली तरी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10-00 ते सायंकाळी 5-00 पर्यंत शिक्षण विभागातील 1188, ग्रामपंचायत विभाग 70, सामान्य प्रशासन विभाग 18 असे 1276 वैद्यकीय देयके प्रलंबित होती. शनिवारी सकाळी 10 वाजले पासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी सांगोला डॉ. दोडमणी, डॉ.निलम यादव, डॉ इरफान सय्यद, डॉ. अमितकुमार पाटील, डॉ, सुधाकर केदार, डॉ. अरूण पाळवदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील, कनिष्ठ सहाय्यक कोळी ही आरोग्य विभागाची टीम वैद्यकीय देयकांच्या तांत्रिक मंजूरीसाठी उपस्थित होती. त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या विशेष मोहीमेमध्ये दिवसभरात शिक्षण विभाग 720, ग्रामपंचायत विभाग 43, सामान्य प्रशासन विभाग 18 व इतर विभागातील 10 अशी 791 वैद्यकीय देयके निकाली काढण्यात आली.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड हे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!