मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी वित्त विभागानं ४१० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं ४१०.३० कोटी रूपये निधीला मंजुरी दिली आहे. यासाठी वित्त विभागानं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आहे.
अनुसूचित जाती घटकांकरिता असणारा हा निधी वित्त विभागानं लाडकी बहीण योजणेसाठी वळवला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला.
याबाबत माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या, सणासुदीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना तो हप्ता देण्यात यावा असा आमचा प्रयत्न असतो. विभाग म्हणून आम्ही याबाबतची प्रक्रिया मान्यतेसाठी दिली आहे. सणासुदीच्या कालावधीत निधी प्राप्त व्हावा ही आमची अपेक्षा असते. ज्यावेळी निधी मिळेल त्या क्षणी तो वितरित करण्यात येईल.’ तटकरे पुढे म्हणाल्या, ‘सध्याच्या परिस्थितीत जिथं नुकसानग्रस्त भाग आहे तिथं अधिकाधिक नुकसान भरपाई देणं याकडं शाससानाचं प्राधान्य आहे. ज्या क्षणी लाडक्या बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजूरी ज्या क्षणाला आम्हाला येईल तशी ती लवकरात लवकर वितरित करू. सणासुदीच्या काळात लवकर मंजूरी आली तर चांगलंच आहे.’