नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अरबी समुद्रातील अदनच्या आखातात मार्शल बेटाचे राष्ट्रध्वज असलेल्या एका व्यावसायिक जहाजावर बुधवारी रात्री ड्रोन हल्ला झाला. ९ भारतीयांसह चालक दलाचे २२ सदस्य असलेल्या जहाजाकडून आपत्कालीन संदेश मिळल्यानंतर लागलीच भारतीय नौदलाने प्रत्युत्तराची कारवाई केली. सुदैवाने ड्रोन हल्ल्यात जहाजावर कुठल्याही प्रकारची जीवित तथा वित्तहानी झाली नाही. अरबी समुद्र आणि लाल समुद्रात गत काही काळापासून इराणसमर्थित हौथी बंडखोरांकडून हल्ले वाढत असल्याने चिंतचे वातावरण पसरलेले आहे.
‘जेन्को पिकार्डी’ नामक व्यावसायिक जहाज अदर बंदरापासून ६० नॉटिकल मैल अंतरावर असताना त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाकडून आपत्कालीन संदेश जारी करण्यात आला. हा संदेश मिळताच भारतीय नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेने तासाभरात प्रत्युत्तराची कारवाई केली. ड्रोन हल्ल्यात जहाजाच्या एका भागात आग लागली होती. परंतु नंतर ही आग विझविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय नौदलाच्या स्फोटक आयुध निकामी करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यावसायिक जहाजाचे गुरुवारी सकाळी निरीक्षण केले. जहाजाची सुरक्षाविषयक तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला पुढील प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला. समुद्री लुटविरोधी अभियानांतर्गत अदनच्या आखातात भारतीय युद्धनौकेला तैनात करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय नौदलाने ५ जानेवारी रोजी एक जहाजाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला होता. उत्तर अरबी समुद्रात लायबेरियाचा राष्ट्रध्वज असलेल्या जहाजावरील सर्वांची सुटका नौदलाने केली होती. या जहाजावरील चालक दलात २१ भारतीयांचा समावेश होता.