ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुबई विमानतळ ठप्प, मुंबईत परतलेल्या प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई :  वृत्तसंस्था 

इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने भीषण रूप धारण केले आहे. या घडामोडीनंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले झाल्याची माहिती समोर आली. परिणामी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले.

याचा थेट परिणाम दुबई विमानतळावर वरील उड्डाणांवर झाला. अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या, तर काही विमानं तासन्तास धावपट्टीवरच थांबून राहिली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पर्यटन, व्यवसाय किंवा पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी गेलेले हजारो प्रवासी दुबईत अडकून पडले. विमानतळ परिसरात भीती, गोंधळ आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुबईहून एक विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल झाले. त्या विमानातून परतलेल्या अजय (नाव बदललेले) या प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधताना भयावह अनुभव कथन केला.

अजय यांनी सांगितले की, ते मुंबईहून हैदराबादमार्गे दुबईला पोहोचले होते आणि तेथून अमेरिकेसाठी पुढील प्रवास नियोजित होता. सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रवासी विमानात बसले; मात्र दीर्घकाळ विमानाने उड्डाण घेतले नाही. सुरुवातीला विमान कंपनीकडून तांत्रिक कारण सांगण्यात आले. सात ते आठ तास उलटल्यानंतर अखेर युद्धस्थितीमुळे उड्डाण रद्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही माहिती मिळताच विमानातील वातावरण तणावपूर्ण झाले. अनेक प्रवाशांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर धावपळ आणि संभ्रमाचे चित्र होते.

प्रवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बसेसद्वारे हॉटेलमध्ये हलवण्यात आले. मात्र जागा अपुरी पडल्याने अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अजय यांच्या मते, दहा ते बारा तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर त्यांना हॉटेल मिळाले. बाहेरून स्फोटांचे आवाज ऐकू येत होते आणि बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोट दिसत होते. हॉटेल प्रशासनाने खबरदारी म्हणून पाहुण्यांना बाहेर पडण्यास किंवा खिडक्यांजवळ उभे राहण्यास सक्त मनाई केली होती. अनेकजण उपाशीपोटी आपल्या खोल्यांमध्येच थांबून होते. नेमके काय घडत आहे, याची स्पष्ट माहिती मिळत नव्हती.

दोन दिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होती. भीती आणि अनिश्चिततेमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता होती. मात्र स्थानिक प्रशासन आणि विमान कंपन्यांनी हळूहळू काही उड्डाणे पुन्हा सुरू केली. मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाणाची माहिती मिळताच अजय आणि इतर प्रवाशांनी तातडीने संपर्क साधून परतीचा प्रवास निश्चित केला. अखेर ते मुंबईत सुखरूप दाखल झाले; मात्र मध्यपूर्वेतील या तणावपूर्ण परिस्थितीने जागतिक विमानवाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिस्थितीवर जगभरातील देशांचे बारकाईने लक्ष असून पुढील काही दिवस मध्यपूर्वेसाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!