अक्कलकोट, दि.३० : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले असून या ठिकाणी विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या गटाची सत्ता आली आहे.याठिकाणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून त्यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. दुधनीत बाजार समितीच्या स्थापनेपासून म्हेत्रे गटाची सत्ता होती ती उलथवून टाकण्यामध्ये आमदार कल्याणशेट्टी व पाटील गटाला मोठे यश आले आहे.या ठिकाणी एकूण १८ जागा होत्या त्यापैकी
दोन जागा या बिनविरोध झाल्याने उर्वरित १६ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.यात १६ जागांपैकी १२ जागा ह्या आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने जिंकल्या.तर ६ जागांवर म्हेत्रे गटाला समाधान मानावे लागले.एकूण जागांचा विचार करता १८ पैकी भाजपने सोसायटीत ११ व ग्रामपंचायतीत १ अशा
१२ तर काँग्रेसने ग्रामपंचायतमध्ये ३,व्यापारी २ बिनविरोध ,हमाल तोलार मतदार संघातून १ अशा ६ जागा जिंकल्या आहेत.प्रारंभी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण याठिकाणी ९७
टक्के मतदान झाले.मतदान आणि मतमोजणी
दोन्ही एकाच दिवशी असल्याने दुधनीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.सकाळच्या सत्रामध्ये मोठया प्रमाणात मतदान झाले.
दोन्ही बाजूने अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक जण आपापला अंदाज बांधत होता. यात नागणसूर ,मैंदर्गी आणि दुधनी या तिन्ही ठिकाणी आपापल्या गटाच्या नियोजनानुसार प्रत्येक जण पॅनलच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत होता.या निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस पाहायला मिळाली.आमदार कल्याणशेट्टी व माजी आमदार पाटील गटाकडून ते स्वतः व भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,आप्पासाहेब पाटील,महेश पाटील,अप्पू परमशेट्टी,सुनील बंडगर,शिवशरण जोजन हे मतदान केंद्राच्या ठिकाणी ठाण मांडून होते तर म्हेत्रे गटाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील व काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते. निवडीनंतर भाजपच्या विजयी उमेदवाराने एकच जल्लोष केला.
उमेदवार निहाय मिळालेली मते खालील प्रमाणे –
सहकारी संस्था सर्वसाधारण – चंद्रकांत कालिबत्ते ( १८१ ), विश्वनाथ कोगनूर ( २०१ विजयी ), मल्लिकार्जुन झळकी (२०१ विजयी ), अशोक ढंगापुरे (१७७ ), विश्वनाथ नागुर ( २०२ विजयी ), सातलींगप्पा परमशेट्टी ( २०० विजयी ), सतीश प्रचंडे ( १७९ ), काशिनाथ बणजगोळ ( १८० ), सिद्धाराम बाके ( २०४ विजयी ),देवेंद्र बिराजदार ( २०५ विजयी ),काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे ( १७७ ) ,महादेव येळमेली ( १७२ ), मोतीराम राठोड ( २०१ विजयी ), राजेंद्र हौदे ( १७४ ),सहकारी संस्था सर्वसाधारण महिला राखीव – मल्लम्मा दुर्गी ( १८६ ), विजयालक्ष्मी पाटील ( १७६ ), सुवर्णा मचाले ( २०३ विजयी ),अश्विनी सालेगाव ( २०३ विजयी ), सहकारी संस्था इतर मागासवर्ग – प्रथमेश म्हेत्रे ( १८५ ), वहीदपाशा शेख (२०१ विजयी ) ,सहकारी संस्था भटक्या जाती विमुक्त जमाती – महेश जानकर ( १७८ ),निंगणणा पुजारी ( २०८ ),ग्रामपंचायत सर्वसाधारण –
सिद्धाराम तोळणूरे ( १७१ विजयी ),रमेश पाटील ( १७० विजयी ), सिद्धणा पुजारी( १६८ ) ,मल्लिनाथ बिराजदार ( १६६ ) ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ – शिवानंद पाटील ( १२१ विजयी ), लक्ष्मीपुत्र बिराजदार ( ११४ ), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती – विश्वनाथ इटेनवरु ( ११४ ), इराणा दसाडे ( १२३ विजयी ), हमाल व तोलार – बाबू कोळी ( १४५ विजयी ),सैदप्पा मानकर ( ६६ ), व्यापारी मतदारसंघ – सातलिंगप्पा परमशेट्टी , चंद्रकांत येगदी हे म्हेत्रे गटाचे यापूर्वी बिनविरोध झाले आहेत.
दुधनीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सत्ता
दुधनी बाजार समिती म्हणजे म्हेत्रे परिवाराची झाली होती.तिथे आता सर्वसामान्य लोकांची सत्ता आली आहे.जनतेने भाजपवर टाकलेला हा खूप मोठा विश्वास आहे. एकाधिकार शाहीला लोकांनी कंटाळून आम्हाला निवडून दिले आहे त्यांच्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र राहू.
सचिन कल्याणशेट्टी,आमदार