ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बदलत्या राजकारणामुळे निष्ठावानांचा ‘कट्टरपणा’ हरवतोय

अक्कलकोटमधील कार्यकर्त्यांना पडतोय निष्ठा व विचारधारेचा विसर

अक्कलकोट : मारुती बावडे

पूर्वी अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात सत्तेसाठी एक प्रकारची तीव्र स्पर्धा असायची.आता मात्र कोण कुठे आहे आणि काय करतोय हे सांगणे कठीण झालेले आहे.या बदलत्या राजकारणाच्या ‘ट्रेंड’ मुळे राजकारणाची व्याख्याच बदलुन गेलेली आहे आणि कार्यकर्ता देखील आता स्वतःला बदलतो आहे यामुळे कार्यकर्त्यांमधील ‘कट्टरता’ मात्र हरवत चालला आहे हे नक्की.केवळ अक्कलकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्येच हा प्रकार सुरू आहे.
पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले या दोन्ही पक्षांमधील नेत्यांची टीका एवढी टोकाला गेली की कोण कुठे आहे हे समजायला सुद्धा तयार नाही.आता यात कार्यकर्ताच ‘अड्जस्ट’ करून घेत आहे.

सहा महिन्यापूर्वी,दोन महिन्यापूर्वी एकत्र असलेले नेते महिना, दीड महिन्यानंतर एकमेकांच्या विरोधात बोलू लागले आहेत.आता एकमेकांवर टीका करताना सुद्धा दहा वेळा विचार करून टीका करण्याची वेळ नेतेमंडळीवर आलेली आहे.राजकारणातील हिन पातळी अनेक वेळा राज्याच्या राजकारणात सुद्धा दिसून आलेली आहे याचे अनेक उदाहरणे देता येतील.त्याचे पडसाद हळू हळू ग्रामीण राजकारणावर देखील उमटत आहेत.दहा वर्षांपूर्वी एखाद्या नेत्याचा कट्टर असलेला कार्यकर्ता तो सत्ताधाऱ्याच्या अगदी जवळचा गळ्यातील ‘ताईत’ बनलेला आहे त्यामुळे निष्ठा,विचारधारा ही गोष्ट नावालाच राहिलेली आहे.प्रत्येक जण आपापले हित आणि आपला फायदा या दोनच गोष्टीमध्ये गुंतलेला आहे.राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी इतक्या सहजतेने जर राजकारणामध्ये एकत्र येऊन राजकारण करत असतील तर आपण का करू नये अशा प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे सुरू आहे.

आपण का स्पर्धा करावी, आपण का एकमेकांशी विरोध करावा, आपण देखील सर्वांशी जुळवून आपली कामे करून घ्यावी असा मतप्रवाह कट्टर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे याला कारण देखील नेते मंडळीच आहेत.नेतेमंडळी जोपर्यंत एकमेकांवर टोकाचे राजकारण करत नाहीत तोपर्यंत कार्यकर्ते एकमेकाला भिडणार नाहीत याचा अर्थ एकमेकाला भिडावेच असा नाही तर पूर्वी एखाद्या विषयावरून जसे विचारांचे आणि निष्ठेचे राजकारण व्हायचे आणि दोन गट पडायचे आणि लगेच त्यावर कुरघोडीचे राजकारण व्हायचे किंवा ते सोयीस्करपणे केले जायचे.आता तशी परिस्थिती ना ग्रामीण भागात राहिलेली आहे.ना राज्यात राहिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडणुकीच्या आधी नेत्यांपासून चार हात लांब राहिलेले कार्यकर्ते निवडून आल्यावर नेतेमंडळी सोबत फोटो सेशन करून सोशल मीडियावर फोटो व्हायरल करताना दिसत आहेत यावरून कोण कोणाचे हे कळायलाच तयार नाही.

काही लोक काँग्रेसकडे जात आहेत काही लोक भाजपकडे जात आहेत. काही लोक केवळ निधी मिळतो म्हणून भाजपकडे जात आहेत काही लोक तटस्थ राहत आहेत काही जणांना वाटते की आपण भाजपकडे गेलो तर साहेबांना काय वाटेल आणि काही जणांना वाटते साहेबांकडे गेलो तर आपल्याला पाच वर्ष निधी मिळणार नाही, गावात विकास नाही झाला तर पुन्हा कुठल्या तोंडाने निवडणुकीला सामोरे जाणार अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे जो तो नेता आणि कार्यकर्ता कातडी बचाव धोरण स्वीकारून ‘राजकारण’ करताना पाहायला मिळत आहे.खरे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर नसतातच परंतु वर्चस्वाच्या लढाईत एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता ज्यावेळी निवडून येतो त्याचा संबंध कुणाबरोबर जास्त आहे त्यावरून त्या पक्षाची सत्ता त्या गावात आली,असे संबोधले जाते.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली आहे ती म्हणजे यावेळी अवघ्या ३० ते ३५ च्या आतले लोक गावचे सरपंच झालेले आहेत.प्रस्थापित राजकारण्यांना हा मोठा हादरा म्हणावा लागेल.आता युवकांच्या मागे मोठ्या नेते मंडळींना पळण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी एखादा कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या विरोधात कट्टर असायचा किंवा एखादा कार्यकर्ता भाजपच्या विरोधात कट्टर भूमिका घ्यायचा.

आता राज्यातील ही गोंधळाची स्थिती बघून टीका करताना जाऊ द्या सोडा, आपल्याला काय करायचेय या भूमिकेत जो तो दिसत आहे.सध्या तालुक्याच्या राजकारणामध्ये देखील एकेकाळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक असलेले लोक दादांच्या सोबत आहेत.सत्तेसाठी म्हणा किंवा नेतृत्व आवडले म्हणून.ही वस्तुस्थिती आहे.काहीजण दादा समर्थक देखील वरून जरी ‘दादा’ सोबत असले तरी आतून ते साहेबांसोबत जोडून घेत आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे.मध्यंतरी नागणसूर मध्ये जी शहराच्या राजकारणाबद्दल चर्चा झाली ती घटना देखील कार्यकर्त्यांना बरेच काही सांगून जाणारी आहे.ज्यावेळी एकमेकांचे कट्टर विरोधी नेते मंडळी एकत्र येतात त्यावेळी ते काय बोलतात या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष असते त्यातून कार्यकर्ता हा बोध घेत असतो.या बदलत्या राजकारणातील ‘ट्रेंड’ मुळे कार्यकर्त्यातील ‘कट्टरपणा’ मात्र हरवत चालला आहे याचा विचार नेतेमंडळीनेच करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!