सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-पुणे दरम्यान ई-शिवाई बस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता शनिवार (दि. 30) नोव्हेंबरपासून सहा बसच्या माध्यमातून सोलापूर-लातूर-सोलापूर मार्गावर ही ई- शिवाई बसची सेवा सुरू होणार असल्याने सोलापूरकरांचा प्रवास आरामदायी आनंदी होणार आहे.
सोलापूर ते लातूर मार्गांवर बस धावणार आहे. या बसेस सोलापूर-तुळजापूर-उजनी औसा-लातूर परत अशा नियमित धावतील. या बसेस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतील. प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूरहून लातूरपर्यंत बस सेवा उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक बस ही संपूर्ण एसी राहील. प्रवाशांना जलद, सुरक्षित व आरामदायी असा प्रवास असेल. तरी प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
सोलापूर ते लातूर सकाळी 06.00 पासून सायंकाळी 05.30 पर्यंत एकूण 12 फेऱ्या
लातूर ते सोलापूर सकाळी 09.00 पासून सायंकाळी 09.00 पर्यंत एकूण 12 फेऱ्या
ई-शिवाईची वैशिष्ट्ये
– बसेस या ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण विरहित असतील.
– प्रवासी क्षमता 42.
– फुल चार्जिंगनंतर पार करणारे अंतर ३०० किलोमीटर.
– बस पूर्ण वातानुकूलित.
– बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा.
– स्वयंचलित दरवाजे.
– रेल्वेप्रमाणे पुस्तके वाचण्यासाठी सीटच्यावरील बाजूला लाईट.
– बसेसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत असेल.
– अमृत जेष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत असेल.
– जेष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत असेल तसेच ईतर सर्व सवलती असतील.
सोलापूर-लातूर-सोलापूर मार्गावर शनिवारपासून इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. यामुळे या मार्गावरील तुळजापूर-उजनी-औसा येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तसेच प्रवास आरामदायी होणार आहे. तरी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा.
– अमोल गोंजारी , विभाग नियंत्रक, सोलापूर