ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार गटात भूकंप, प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे वृत्तसंस्था : ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी उलथापालथ घडली असून, अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी ठाम भूमिका घेणारे पक्षातील बडे नेते प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे शरद पवार गटात राजकीय भूकंप झाला असून, पक्षांतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू असतानाच हा धक्का बसला आहे. अद्याप जागावाटपावर ठोस चर्चा झालेली नसली, तरी अजित पवार गटासोबत जाण्याबाबत शरद पवार गटातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचेच प्रतिबिंब प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यातून दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप यांनी उघडपणे अजित पवार यांच्यासोबत आघाडीला विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास होणारे राजकीय फायदे आणि अजित पवार गटासोबत गेल्यास होणारे संभाव्य नुकसान याचे गणित त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर मांडले होते. इतकेच नव्हे, तर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्यही जगताप यांनी माध्यमांसमोर केले होते. मात्र, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक पातळीवर अजित पवार गटासोबत चर्चा करण्याचे संकेत दिल्याने समीकरणे बदलली. याच पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप नाराज झाल्याची चर्चा होती. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर पक्षात राहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती.

अखेर या नाराजीतूनच प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा अद्याप अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलेला नसला, तरी त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशांत जगताप लवकरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असून, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!