नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना येत्या १८ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने यापूर्वी तीन वेळेस केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. पण तिन्ही वेळेस केजरीवाल यांनी चौकशीस दांडी मारली. तर भाजप ईडीचा दुरुपयोग करत असून केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी शनिवारी केला.
ईडीने आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना १८ जानेवारीची नोटीस बजावली आहे. पण केजरीवाल हे १८ ते २० जानेवारीपर्यंत तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्ष सज्जतेचा आढावा घेणार आहेत. आप नेते गोपाल राय यांनी नोटीसच्या तारखेकडे लक्ष वेधत केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी भाजपाचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी लावला. ईडीने भाजपाचे राजकीय शस्त्र बनण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे. भाजप ईडीचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत लावला. तर यावेळी केजरीवाल ईडीसमोर हजर राहणार का ? या प्रश्नाचे उत्तर देताना राय यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असून कायद्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे राय यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत ३ जानेवारी रोजी केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा चौकशीला दांडी मारली होती गतवर्षी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी देखील त्यांना हजर होण्यास सांगितले होते. ईडीकडून जारी केल्या जात असलेल्या नोटीस या कायद्याला धरून नसल्याचा आरोप केजरीवाल व आपच्या नेत्यांनी यापूर्वीच अनेक वेळा लावला आहे. पण केजरीवाल यांना बजावल्या जात असलेल्या नोटीस या पीएमएल प्रक्रिया व कायद्यानुसार असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणात ईडीकडून दाखल आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा अनेक वेळा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्ली मद्य धोरण २०२१-२२ च्या तयारीवेळी आरोपी केजरीवाल यांच्या संपर्कात होते, असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. एका नवीन पुरक आरोपपत्राद्वारे ईडीकडून केजरीवाल यांच्यावर कथित लाचखोरीचे लाभार्थी म्हणून आरोप केले जाण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत मद्य धोरणप्रकरणी आपचे नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत.