मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी चौकशी सुरू आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथिचत कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सूरज चव्हाण अटक झालेल्या प्रकरणात संदीप राऊत यांचीही होणार चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आले आहे. याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने खिचडी वाटप केली होती. खिचडी वाटपाचं कंत्राट आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खासगी फर्मला मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ठाकरे नवनवीन नेत्यांची चौकशी होत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती बनवण्यात सूरज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा आहे.