मुंबई, वृत्तसंस्था
राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली. राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचेही अभिनंदन करतो. मी म्हणालो होतो.. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आलो नाही तर शेती करायला जाईन. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले…अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे ..त्यानुसार 237 आमदार आहेत. त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झालं आहे. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं. विरोधी पक्षांच्या अध्यक्ष पदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा अभ्यास करुन निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात एक शायरी देखील बोलले. कर नाही, त्याला नाही डर…उसका नाम राहुल नार्वेकर…असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर रामदास आठवले आणि माझी आता युती झाली असं मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केलं.
नाना पटोले याचं मी आभार मानतो की, नार्वेकर यांच्यासाठी त्यांनी अध्यक्षपद रिक्त केलं. खरं आहे ते बोललं पाहिजे. शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले. आम्ही तिकडे लक्ष दिल नाही. आमच काम करत राहिलो. पहिले आम्ही दोघे होतो. नंतर अजितदादा आले. त्यांनंतर आमचं तीन शिफ्टमध्ये काम सुरु होतं, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकसभेला फेक नेरिटीव्ह केलं त्याचा फटका आम्हाला बसला. आता विरोधकांचा पराभव झाल्यावर ईव्हीएम मशीनवर खापर फोडताय. आता निर्जीव ईव्हीएमवरती आरोप केला जातोय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन देखील म्हणाले की, हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर बोलता. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले…नाना पटोले वाचले…कोणी 1 लाखाने येतो तर कोणी दोनशे आठ मतांनी आले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाना पटोले यांना टोला लगावला.