मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीकास्त्र सोडत आहे, नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे हे डरपोक शिवसैनिक, असा व्यक्ती मी आयुष्यात पाहिलेला नाही, ईडी-सीबीआयच्या भीतीपोटी या माणसाने गद्दारी केली, यांच्याकडे निष्ठा, नैतिकता, विचार असं काहीच नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. ठाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे किती डरपोक आहेत, याबाबत अयोध्या दौऱ्यावर असताना शिवसेना फुटण्यापूर्वीचा एकनाथ शिंदे आणि त्यांचा झालेला संवादच त्यांनी भरसभेत सांगितला.
संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्वजण 15 जून 2022 रोजी अयोध्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा राजन विचारे, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, शिवसेनेचे आमदार, खासदार आमच्याबरोबर होते. आम्ही अयोध्या दौऱ्यावर असताना 14 जूनच्या रात्री हे महाशय म्हणजेच एकनाथ शिंदे माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. त्यावर मी त्यांना विचारलं, काय निर्णय घ्यायचा? तर ते मला म्हणाले, हे काही माझं तुरुंगात जायचं वय नाही. मी त्यांना विचारलं, तुम्हाला तुरुंगात कोण टाकतंय? तर ते मला म्हणाले, मला भीती वाटते, मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आमचा हा संवाद अयोध्येत रामाच्या साक्षीने चालला होता.
संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे मला म्हणाले, तुम्ही काहीतरी करा. त्यावर मी त्यांना विचारलं, काय करायचं?, तर ते मला म्हणाले, आपण मोदींबरोबर जायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं, मोदींबरोबर का जायचं? इथे आपलं सगळं चांगलं चाललंय. आपले पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार उत्तमपणे चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यकारभाराने गती पकडली आहे आणि तुम्ही म्हणताय हा निर्णय बदलायला हवा, कशासाठी बदलायचा?, त्यावर ते मला एवढंच म्हणाले, माझी तुरुंगात जायची इच्छा नाही.