मुंबई वृत्तसंस्था
आज महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे दिला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील राजभवनात उपस्थित होते. अद्याप राज्यात नवीन सरकार स्थापन झालं नसल्याने राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांच्यावरच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
https://x.com/PTI_News/status/1861287004492964323
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नवीन सरकारचा शपथविधी रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह सर्व महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, तोवर शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी ठेवले जाईल आणि पुढची चार वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असा तर्कही फिरत आहे. मात्र, फडणवीस यांना आताच मुख्यमंत्री केले तरी महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरी उत्तमच असेल, उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदे या यशासाठी योगदान देऊ शकतात, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. आधी फडणवीस यांना दोन वर्षे, नंतर शिंदे यांना दोन वर्षे आणि मग शेवटी अजित पवार यांना एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असेही बोलले जात आहे. सोबतच फडणवीस, शिंदे यांना अडीच अडीच वर्षे हे पद दिले जाईल, असा दावाही काही जण करत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद वा महत्त्वाचे केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. अशावेळी खा. श्रीकांत शिंदे हे राज्य मंत्रिमंडळात राहतील, असा तर्कही दिला जात आहे.