मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात होणाऱ्या आगामी निवडणूक भाजपने लढविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावर बोलताना शिंदे यांचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, आगामी निवडणुका आम्ही भाजपसोबत युतीत लढणार असून, त्या धनुष्यबाणावरच लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट संवाद भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत झाला आहे.त्यामुळे शिंदे गटाचे नेते कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही असेही शिरसाट म्हणाले आहे.
दरम्यान संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात भविष्य पाहणारे लोकांची संख्या जास्त झाली आहे. तुम्ही अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला शिकवू नयेत. तुम्हाला आता आतल्या मीटिंगमध्ये मुद्दे देखील कळत असेल तर तुमचे कठीण आहे. तुम्ही कुठेही कान लावू नका, तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा,असा खोचक टोलाही शिरसाट यांनी आव्हाडांना लगावला आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. पण फक्त यायचे,बसायचे,जेवायचे,चहा घ्यायच इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपुरात केले. त्याऐवजी काही चांगले बोलले असते तर बरे झाले असते. त्यामुळे दर्शनापुरते आले आणि गेले इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.