नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तराखंड येथे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा घेतली. उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. भारताला जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता बनवण्याची गॅरंटी आपण दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये तुमचा मुलगा एक मोठं काम करणार आहे. नागरिकांना २४ तास वीज मिळावी. तसेच विजेचे बिल शून्य व्हावे आणि त्यातून नागरिकांना कमाईचे साधन निर्माण केले जाणार आहे. तसेच या टर्ममध्ये आपण भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करू असंही मोदी यावेळी म्हणालेत.
वीज बिलावर बोलातना पीएम मोदी म्हणाले की, त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केलीय. यात घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यास सरकारकडून मदत केली जाईल. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना ३०० यूनिट वीज लागत असते. घरात वापरली जाणारी वीज या सोलर पॅनलद्वारे मोफत मिळेल. तसेच यातून अधिक तयार होणारी वीज सरकार खरेदी करेल, यातून या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. देशात ६० वर्षापासून सत्ता गाजवणारे १० वर्षापासून सत्तेपासून दूर राहिले तर ते आता देशात आग लावण्याचे गोष्ट करत आहेत. दोन- तीन दिवसापूर्वी रामलीला मैदानावर विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून सभा घेण्यात आली होती.त्यात मोदी सरकारवर आसाडू ओढताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.
नरेंद्र मोदी निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ४०० पारचा नारा भाजपकडून देण्यात येत आहे. परंतु हे मॅच फिक्सिंग केली नाही तर भाजपला १८० जागा देखील मिळणार नाहीत. जर भाजप या निवडणुकीत जिंकली तर देशाचं संविधान बदलण्यात येईल आणि संपूर्ण देशात आग लागेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुढील टर्ममध्ये भाजप काय करणार याची घोषणाही त्यांनी केली. आपल्या पुढील टर्ममध्ये भ्रष्टाचारावर कठोर कारवाई केली जाईल. ‘मी म्हणतो भ्रष्टाचार हटाओ. ते म्हणतात भ्रष्टाचारी बचाओ’, परंतु मोदी त्यांच्या शिव्या आणि धमक्यांना घाबरणारा नाहीये. प्रत्येक भ्रष्टचाऱ्यावर कारवाई केली जाईल. तिसऱ्या टर्मची सुरुवात भ्रष्टचारावर कारवाई करण्यापासूनच होईल असं मोदी म्हणालेत.