ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम करा-आयएएस ज्ञानेश्वर पाटील
गुलाबपाकळ्या उधळुन आयएएस अधिकाऱ्यांचा कुरनुरच्या शाळेत स्वागत..
चपळगाव : प्रतिनिधी
इंग्रजी मिडीयमच्या शाळांचा सर्वत्र पेव फुटला आहे.मात्र या शाळांमधील शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही.म्हणुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच गरिबांची मुलं घडतात असे मत भारत सरकारचे आयएएस अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केले.
कुरनूर ता.अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे नुतनीकरण व डिजीटलीकरणाचे काम पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन साकार होत आहे.याची पाहणी ज्ञानेश्वर पाटील यांनी केली. तत्पूर्वी शाळेतील चिमुकल्यांनी आयएस अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांचा गुलाब पाकळ्या उधळून अनोखे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,माजी सरपंच अमर पाटील,मुख्याध्यापक विजयकुमार इंगळे,ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण,अण्णासाहेब सुरवसे,कृष्णा बिराजदार,सिद्धनाथ जगताप,भीम मोरे,रानबा काळे,अमोल काळे, स्वामीराव सुरवसे,परशुराम बेडगे, सुरेश माने,नारायण बागल,श्रीशैल स्वामी,रफिक तांबोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की,कुरनूरच्या जिल्हा परिषद शाळेत झालेला बदल पाहून खूप आनंद झाला.प्रत्येक वर्गात इयत्तानिहाय अभ्यासक्रम भिंतीवर रंगविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत खूप मोठी मदत होणार आहे.प्रत्येक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असा बदल झाल्यास शिक्षण क्षेत्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे कुरनूरच्या जिल्हा परिषद शाळेचा नवा पॅटर्न..?
कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था बिकट झाली होती.मात्र पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने व्यक्तिशः लक्ष घालत या शाळेचे रुपडे पालटले आहे. सुरुवातीलाच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे यांच्या सहकार्याने एशियन पेंट कंपनीकडून जवळपास अडीच लाख रुपयांचे रंगरंगोटीचे काम करत शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे.क्रीडांगणात आवश्यक साहित्य उपलब्ध केले आहेत.प्रत्येक वर्गखोलीत इयत्तानिहाय अभ्यासक्रम रंगवण्यात आले आहे.शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत सिंचन,शेती,प्रशासन,विज्ञान,पशुपालन,कुक्कुटपालन यांसह महत्त्वाचे विषय विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी ठिकठिकाणी पूरक चित्र काढण्यात आले आहेत. महापुरुषांचे ठिकठिकाणी फोटोज साकारण्यात आले आहेत,यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.सद्यस्थितीत प्रत्येक वर्गात ई लर्निंग ची व्यवस्था उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.