मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू अर्थात सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे. सचिन तेंडुलकर यांचा मोठा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने त्याची बालमैत्रीण सानिया चांडोक हिच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यामुळे आता मुंबईतील नामांकित उद्योपती रवी घई यांची नात तेंडुलकर घराण्याच्या सूनबाई होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुडा समारंभ अतिशय खासगी ठेवण्यात आला होता. दोन्ही कुटुंबातील लोक त्यात सहभागी झाले होते. अर्जुन हा वेगवान गोलंदाज असण्यासह अष्टपैलू खेळाडू आहे. तो स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील असूनही, सानिया प्रसिद्धीपासून दूर राहते. ती मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची भागीदार आणि संचालक आहे. दुसरीकडे, घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड वर्ल्डमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप आहे, ज्याची बहुराष्ट्रीय किंमत $१८.४३ अब्ज (१.६ लाख कोटी रुपये) आहे. मुंबईत एक इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील आहे. ब्रुकलिन क्रीमरी या प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँडचेही ते मालक आहेत.
घई कुटुंबाच्या व्यवसायाच्या तुलनेत, मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी हा एक छोटासा उपक्रम आहे. तो २०२२ मध्ये फक्त १ लाख रुपयांच्या भांडवलातून सुरू झाला. मिस्टर पॉज हे मुंबईत स्थित एक पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे स्पा आणि स्टोअर आहे. ते प्राण्यांची त्वचा निगा, सौंदर्य आणि संबंधित उत्पादनांच्या सेवा देते. रवी घई हे ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील इक्बाल किशन घई यांनी देशात क्वालिटी आईस्क्रीम ब्रँड आणला. त्यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्हवर इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल बांधले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, रवी यांनी परदेशात, विशेषतः मध्य पूर्वेत व्यवसाय वाढवला. येथेच रवीने आईस्क्रीम उत्पादन युनिट्स स्थापन केले. ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम ब्रँड रवी घई यांचे नातू शिवन घई यांनी आणला.