नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील घुसखोरीचे विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन करत असल्याचा आरोप केला. तसेच विरोधकांच्या या वर्तणुकीमुळे आगामी लोकसभेतही त्यांचे संख्याबळ घटून ते विरोधी बाकांवरच राहतील, असा दावा मोदींनी केला.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला मंगळवारी मोदींनी संबोधित करताना, संसदेतील घुसखोरीला योग्य ठरवण्याच्या विरोधकांच्या कथित प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली. संसदेतील घुसखोरीची घटना जेवढी चिंताजनक आहे, तेवढेच चिंताजनक या घुसखोरीचे समर्थन करणे आहे. लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या घुसखोरीचा निषेध करणे अपेक्षित होते; परंतु विरोधक या घुसखोरीचे समर्थन करत आहेत. ते या घटनेला राजकीय वळण देत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झाल्याने विरोधक असे वागत आहेत; परंतु विरोधक असेच वागत राहिले तर आगामी लोकसभेत त्यांचे संख्याबळ अजून घटून ते विरोधी बाकांवरच राहतील. आमचे सरकार उलथवून लावणे हे विरोधकांचे लक्ष्य आहे, तर देशाचे उज्ज्वल भविष्य आमचे लक्ष्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.