---Advertisement---

वडिलांच्या निधनानंतरही बारावीचा पेपर दिली, जान्हवीची जिद्द प्रेरणादायी

By team
On: February 11, 2026 1:59 PM
Follow Us:
---Advertisement---

भंडारा  : वृत्तसंस्था

घरात वडिलांचे पार्थिव पडलेले असताना जान्हवी हौशीलाल राहांगडालेने दाखवलेले धैर्य पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आंबागड येथील रहिवासी जान्हवीने, वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख बाजूला ठेवून, बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला आणि आपल्या अदम्य जिद्दीचे दर्शन घडवले.

सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी हौशीलाल राहांगडाले (५१) हे सायकलने घरी परतत असताना अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर डोक्याची दुखापत झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने राहांगडाले कुटुंब शोकाकुल झाले.

दुसरीकडे, मंगळवारी (१० फेब्रुवारी) बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पहिलाच दिवस होता आणि जान्हवीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. अशा कठीण प्रसंगात तिने धैर्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली.

जान्हवी जेव्हा तुमसर येथील जनता विद्यालय मध्ये आपल्या मामाच्या मुलासोबत पोहोचली, तेव्हा तिची अवस्था पाहून शिक्षकही भावनिक झाले. मुख्याध्यापक पंकज बोरकर आणि केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांनी तिला धीर दिला. सतत अश्रू येत असतानाही जान्हवीने इंग्रजीचा पेपर उत्तम प्रकारे दिला. तिने सांगितले, “माझे वडील माझ्या खूप जवळ होते, त्यांचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता. पण त्यांना मी शिकावे असे वाटायचे, म्हणून मी ही परीक्षा दिली.”

परीक्षा संपल्यानंतर जान्हवी तातडीने घरी परतली आणि आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असूनही दररोज ८ किलोमीटरचा प्रवास करून शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या जान्हवीचे धाडस संपूर्ण आंबागड गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

संघटनेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी तिला कौतुक करत तिच्या धैर्याला सलाम केला. “दुःखाचा डोंगर समोर उभा असतानाही शिक्षणाची मशाल विझू न देणाऱ्या जान्हवीची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा ठरेल,” असे स्थानिकांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!