मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. ते अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणार आहेत आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे परंतु विरोधक मात्र विनाकारण त्यावरून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लोकसभा व राज्यसभेत उपस्थित नसतात त्याची माहिती भाजपाने आधी घ्यावी व नंतर बोलावे. पंतप्रधानही सभागृहात नसतात मग त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्यावा.
राज्यातील नोकर भरतीच्या प्रश्नावर सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणाले की, पेपरफुटीच्या घटनांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण हे घोटाळे कुठून सुरु झाले आणि याचे तार कुठपर्यंत जोडले गेले आहेत याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. तरुणांची जी गैरसोय झाली त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. शासनामार्फत काय कारवाई केली जात आहे हे जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणाचे तार कुठपर्यंत आहेत त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत.