ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ईव्हीएम अफवांमुळे ब्रह्मांडमध्ये तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज !

ठाणे वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर मतदानानंतर राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी रात्री जोरदार राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम मशिन्स सील करून त्या स्ट्राँगरूमकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अपक्ष उमेदवार भूषण भोईर मतदान केंद्रात शिरल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. याचदरम्यान ‘ईव्हीएम पळवून नेण्याचा प्रयत्न होत आहे’ अशा अफवा पसरल्याने दोन्ही गटांचे शेकडो समर्थक आमनेसामने आले. संतप्त जमावाने मतपेट्या नेणारी बस अडवली, तर काही वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या मदतीने सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा प्रकार पूर्वनियोजित असून बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे आणि हत्यारे आणल्याचा आरोप केला आहे. तर भूषण भोईर यांच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भोईर यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून हल्ला केल्याचा दावा केला आहे.

प्रभाग क्रमांक ३ ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर भूषण भोईर यांनी अपक्ष पॅनल उभे केले आहे. प्रचारादरम्यान मीनाक्षी शिंदे यांची आगरी समाजाबद्दलची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वातावरण आधीच तणावपूर्ण होते. मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक वादही झाले होते.

दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत मीनाक्षी शिंदे यांची भेट घेतली आणि बोगस मतदानाची चौकशी करण्याची मागणी केली. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सर्व ईव्हीएम आणि मतपेट्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!