चेन्नई सुरत हायवे बाबत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मांडली भूमिका
अक्कलकोट : चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड हायवेमधील बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. आता या माध्यमातून शेतकऱ्यांच्या करोडो रुपयांच्या जमिनी बळकवण्याचा डाव सरकारकडून आखला जात आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना मोबदला नोटीस जारी केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री म्हेत्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या मुद्द्यावर सविस्तरपणे भूमिका मांडली.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तसे होताना दिसत नाही, याउलट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट करण्याचे काम सुरू असून शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. आणि त्यातच भर म्हणून अक्कलकोट तालुक्यातून गेलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला जाहीर करून केंद्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. जमिनीच्या दराविषयी कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अत्यल्प मोबदला देऊन शेतकऱ्यांकडून जमीन हस्तांतरित करण्याचा हा केंद्र शासनाचा कुटील डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मागील आठवड्यापासून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मोबदल्या विषयी नोटीसा जारी करण्यात येत आहेत. यामध्ये जिरायतीसाठी तीन लाख ते पाच लाख, तर बागायतीसाठी पाच ते सात लाख रुपये मोबदला प्रति एकर शासनाने जाहीर केला आहे.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, अक्कलकोट – नळदुर्ग या रस्त्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रतिगुंठा तीन ते चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला आहे. परंतु याच अक्कलकोट तालुक्यात चेन्नई सुरत रस्त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी तीन ते पाच लाख रुपये देऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. एका रस्त्याच्या निर्मितीसाठी गुंठेवारी पद्धतीने तर दुसऱ्या रस्त्यासाठी एकरी मोबदला देऊन शासनाने जणू शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे. म्हणून केंद्र शासनाने याविषयी गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे गुंठेवारी पद्धतीने मोबदला जाहीर करून दिलासा द्यावा, अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्याला संपूर्ण आयुष्याची मदत म्हणून ८५६ रुपयांची नोटीस
अक्कलकोट तालुक्यातील नागनळ्ळी शिवारातून चेन्नई सुरतचा रस्ता जातो. यामध्ये नागनळ्ळी येथील एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून ८५६ रुपयांचा मोबदला जाहीर करण्यात आला आहे. यावर म्हेत्रे यांनी प्रकाश टाकला व ही बाब चुकीची असल्याचे सांगितले. आमच्या तालुक्यातील शेतकरी हे बहुतांशरित्या शेतीवरच अवलंबून असून त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करून भरघोस मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.