सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लष्कर परिसरात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असताना ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयुब सय्यद यांची हत्या त्यांच्या राहत्या घरातच करण्यात आली. आज दुपारी ही बाब उघडकीस येताच परिसरात मोठी गर्दी झाली. सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात धारधार शस्त्राने वार करून किंवा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रात्री सुमारे 11.30 वाजता तीन अनोळखी व्यक्ती अयुब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत, तर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हेच तिघे घरातून बाहेर पडून पसार झाल्याचे फुटेजमध्ये कैद झाले आहे. या तिघांचाच हत्येशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
अयुब सय्यद हे सोशल मीडियावरही चांगलेच प्रसिद्ध होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे मोठे फॉलोअर्स होते आणि त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी उघडपणे जाहीर केली होती. तसेच त्यांच्या अंगावर नेहमी मौल्यवान दागिने असायचे, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही हत्या राजकीय वादातून झाली की सोन्याच्या लुटीसाठी, याचा तपास दोन्ही दिशांनी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येमुळे सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.