---Advertisement---

दोन गुजराती गिळायला निघाले, पण मुंबई सोडणार नाही – उद्धव ठाकरे

By team
On: December 28, 2025 1:51 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तपणे लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

युती जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. “मुंबई महापालिकेवर मराठीच माणूस महापौर होईल आणि तो आमचाच असेल,” असे ठामपणे सांगत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती अखेर प्रत्यक्षात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपाला कोणी ओळखत नव्हते, आम्हीच त्यांना खेडोपाडी पोहोचवले. आज आम्ही ज्यांना मोठे केले, तेच आमच्यावर वार करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत. इतकी वर्षे लढाई लढलो, मुंबई कोणालाही आपल्यापासून हिसकावून घेता येणार नाही,” असेही ते म्हणाले.

भाजपावर आरोपांची झोड उठवत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने केवळ युती तोडलेली नाही तर आपल्याला संपवण्याचा डाव रचला आहे. “माझा एकही माणूस फुटता कामा नये. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकजूट आणि भाजपविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!