ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या गोटात खळबळ : माजी खा.राणेंचा धक्का

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार धक्का दिला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉलमधील मिळकतीचा सुमारे साडे 3 कोटी रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.

पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांची मालमत्ता आहे. या मालमत्तेचा सुमारे 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांचा कर नीलेश राणे यांनी थकवला होता. या थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या कर संकलन विभागाने राणे यांना अनेकदा नोटीस बजावली. पण त्यांनी करभरणा केला नाही. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नीलेश राणे यांच्या या मालमत्तेला सील ठोकले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, महापालिकेने नीलेश राणे यांच्या 3 मजल्यांच्या मिळकतीचे वरचे 2 मजले सील केले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे महापालिका प्रशासनाकडून अशा कारवाईचा नेहमीच गाजावाजा केला जातो. पण या प्रकरणी करण्यात आलेली कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शहरात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली जात आहे. या अंतर्गत नीलेश राणे यांच्या मालमत्तेलाही गत 2 वर्षांपासून सातत्याने नोटीसा बजावण्यात येत होत्या. पण प्रत्येक नोटीसीनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता. यामुळे प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर थेट महापालिका आयुक्तांनाच आफोन करून कारवाई न करण्याची सूचना करण्यात आली होती. यामुळे कारवाई लांबली. पण अखेर मंगळवारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठोस कारवाई करत नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याचे धाडस दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!